Tuesday, June 18, 2019

श्रीमंत


"साब कुछ खाने को दो ना.. सुबह से कुछ नहीं खाया.."
चिरक्या आवाजात त्या भिकाऱ्याच्या पोरींनी आमच्यासमोर हात पसरले. भिकेसाठीची गुंतवणूक म्हणून हातात आधीची चिल्लर होती. आठदहा दिवसात केसांना पाणी लागलेलं नसावं. थोडीफार तीच अवस्था चेहऱ्याची. चेहऱ्यावर कमावलेली अजीजी. भीक मिळण्यासाठी याच गोष्टी कदाचित अधिक उपयोगी ठरत असाव्यात. मात्र यांच्या डोळ्यातून बालपण अजून पूर्णपणे हद्दपार झालं नव्हतं. म्हणूनंच जेव्हा त्यांनी भीक मागायला हात पसरले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाहायचं मी टाळलं. नेहमी असंच करतो मी. बाकी निगरगट्ट बनता येतं. पण डोळ्यात पाहिलं कि संपलं. कदाचित हादेखील त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असेल. मी तरी त्याला नेहमी भुळतो. पण यावेळी मात्र वाडेश्वरमधून बाहेर पडताना जेव्हा त्या भिकाऱ्याच्या पोरींनी भीक मागितली तेव्हा शिताफीनं त्यांच्या डोळ्यात न पाहता मी त्यांना टाळून पुढे आलो. मला वाटलं तोसुद्धा तसंच करेल. त्यामुळं मी त्या भिकाऱ्यांच्या अजिजीच्या आणि माझ्या कनवळूपणाच्या मर्यादेच्या थोडं पुढं येऊन थांबलो. पुरेसा लांब आल्यावर मागं वळून पाहिलं. मला असंच वाटत होतं कि हा पठ्ठ्या माझ्या मागंच असेल. पण हा गडी त्या पोरींच्या इवल्या तळहातावर नाणी ठेवत होता. पैसे मिळाल्यावर त्या पोरी ताबडतोब दुसऱ्या दात्याकडं याचना करायला पळाल्या.
माझ्या कपाळावर आठ्या असतील असं गृहीत धरूनच तो हसला, "ओके.. लेक्चर नको आता."
"लक्ष्मी घरी पाणी भरते आहे. दोन चार शिंतोडे इकडं तिकडं उडाले तर काय फरक पडतो?" माझ्या बोलण्यातला उपरोध त्याला कळतो.
आमचा असा वाद नेहमीचा आहे. मग मी त्याला म्हणतो कि आपण कष्टानं, बुद्धीनं पैसे मिळवतो.. आणि लहान मुलांना भीक दिली कि मग त्यांना कष्टाची सवय कशी लागणार. त्यावर त्याचा युक्तिवाद असतो कि आपल्या हक्काचे पैसे क्लायंटकडून घ्यायला आपल्यालादेखील भिकाच मागाव्या लागतात. आपण काही शे रुपये मोजून खातो. अर्थातच तिथं जायची कुणाची सक्ती नसते. त्यामुळं अशा ठिकाणाहून खाऊन बाहेर पडतो आणि समोर कुणी उपाशी दिसलं तर बरं नाही वाटत. त्यात लहान मुलं असतील तर लॉजिक तसंही कोलमडतं. उगाच अपराधीपणा येतो. मला अर्थातच हि गोष्ट पटत नाही. मग तो मला अन्नसाखळी बद्दल सांगतो कि एकूण पैशावर प्रत्येकाचा हक्क आहे आणि आपल्याकडून त्यांच्याकडे पैसा गेला तर तो पुन्हा आपल्याकडे येतो. यालाच अर्थव्यवस्था म्हणतात वगैरे.
पण गेल्या दहा वर्षात तरी माझा मित्र बदलेला नाही. बरं, हा इसम पक्का भांडवलवादी आहे. साम्यवाद इत्यादी शब्द याच्या आसपासही भटकत नाहीत. याचं स्वतंत्र लॉजिक आहे. तो त्याच तंत्राने चालतो. त्याच्या अशा वागण्यामुळं आतापर्यंत तरी फार नुकसान झालेलं नाही. अडल्यानडल्या कुणालाही हा मदत करणारच. कुणी थेट मदत मागितली तर समजू शकतो. पण हा इसम असा आहे कि जर याला कळलं कि एखाद्याला मदतीची गरज आहे तर हा त्याच्यपर्यंत मदत पोहोचवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतोच. बऱ्याच वेळा उधार दिलेले पैसे परत आलेत. काहीवेळा बुडलेत. काहीवेळा अधांत्तरी राहिलेत. विश्वासानं वेळेला मदत केल्यानंतर कुणी पैसे परत द्यायची टाळाटाळ करतो, अशावेळी त्यालाही राग येतो. पण त्यापेक्षा माणूस दुरावल्याचं त्याला वाईट वाटतं. काहीवेळा लोक गैरफायदा घेतात. पण याचा माणसांच्या चांगुलपणावर जास्त विश्वास आहे.
मागच्या महिन्यात एकदा असाच फोन केला तर मला म्हणाला कि थोड्या वेळाने परत फोन करतो. का तर कुलर खरेदी करतोय. त्यावर काहीच बोलणं झालं नाही. मला कळेना कि याच्या घरी तर एसी आहे. याला कुलर कशाला हवा? मी पण काहीतरी कामात होतो. विसरलो.
त्यानंतर जेव्हा भेट झाली, तेव्हाही विचारायचं राहून गेलं. पुन्हा एकदा वाडेश्वरमध्येच काहीतरी विषय निघाला. तेव्हा लक्षात आलं. त्याला कुलरबद्दल विचारलं.
तर म्हटला, "हो, ते कुलर घ्यायचे होते. म्हणून तर विजय सेल्सला गेलो होतो."
"बरोबर आहे. टेरेसवर उकडत असेल नाही? किंवा कारमधून घेऊन जात येतो. ज्यांच्याकडं एसी नसतो, त्यांच्याकडं गेलं कि अडचण येत असेल." उपरोध हा आमच्या बोलण्याचा स्थायीभाव आहे. त्याशिवाय अन्न पचत नाही.
"नाही.. अरे टेरेसवर एसी बसवला आणि एसी नसलेल्यांच्या घरी आपण तसाही जात नाही."
"ते पण खरं आहे. मग? आणला का कुलर?"
"आणला म्हणजे काय? तसाही तेच आणून देतात. पण चार होते ना.. त्यांना पत्ते दिले. त्यांनी डिलिव्हरी केली."
नेहमी आम्ही करतो ती चेष्टा वेगळी आणि हि गोष्ट वेगळी. ते एसी नसणाऱ्या घरी जात नाही वगैरे गंमत होती. मला वाटलं तसंच चार कुलरचं असेल. पण हा माणूस खरं बोलत होता.
"चार कुलर? सेल्समनने पार्टी केली असेल.. किस ख़ुशी में?"
"अरे घरी चार मोलकरणी आहेत. चौघींना एक एक."
"seriously?"
"अरे हो तर? त्या आपापसात बोलत होत्या ते बायकोनं ऐकलं. कि पत्र्याच्या घरामध्ये राहतात रे त्या. घरात इतकी माणसं. एवढं उकडतं. झोप पूर्ण होत नाही."
नेहमीप्रमाणे मी गपगार. एक कुलर सात आठ हजारांचा तरी असेल. म्हणजे तीसेक हजार रुपये खर्च केले यानं. पैसा असणं वेगळं आणि तो खर्च करता येणं वेगळं. त्यातसुद्धा दुसऱ्याचं दुःख समजून घेत त्यांची अपेक्षा नसताना खर्च करायला हत्तीएवढं काळीज हवं.
माझ्या मित्राला मी इतकी वर्षं ओळखतोय. तो काहीही करू शकतो हे मला माहित आहे. पण गंमत हि आहे कि खाली पडलेलं नाणं कुणी उचलून देत असेल तर फोटो काढून आपणच त्याला मदत केल्याचं फेसबुकवर जाहीर करण्याच्या काळात पत्र्याच्या घरात राहणाऱ्या मोलकरणीच्या मुलांना शांत झोप मिळावी म्हणून त्यांना कुलर देतो आणि साधं कुणाला सांगत पण नाही. अर्थात माझ्या मित्राला मी अनेक वर्ष ओळखतो आणि तोच असा करू शकतो, हे मला चांगलं माहित आहे.
म्हणूनच मी त्याचं नावंही घेतलं नाही. कारण त्याला आवडणार नाही.
"श्रीमंती हि वृत्ती आहे. तिचा पैशाशी फार संबंध नाही," असं हा एकदा म्हणाला होता.
कागदोपत्री मध्यमवर्गीय असलेला असा दिलदार राजामाणूस तुमच्याही पाहण्यात असेल. तेव्हा मला त्याच्याविषयी काय वाटतं ते तुम्हाला कळेल. याच्या हृदयाच्या खजिन्याची संपत्ती म्हणून मोजदाद केली तर त्याच्या आयकरात भारत नक्की मोठी अर्थव्यवस्था होईल.