“माजघर.. उदंड असू दे! स्वयंपाकघर.. उदंड असू दे!”
गणपती घरी आले की पहिलं काम म्हणजे त्यांना घर दाखवायचं. टिचभर अपार्टमेंटमधली एक एक खोली दाखवत जुन्या मोठ्या बैठ्या घरातील प्रशस्त खोल्यांची नांवं घ्यायची. माझी आई हे काम उत्साहानं करायची. तेवढंच त्या प्रशस्त घराच्या आठवणीत तिला रमतां यायचं. प्रत्येक खोलीचं नांव घेताना पुढं ‘उदंड असू दे’ म्हणायची. गणपती बुद्धीची देवता. त्यात आपल्या घरी आलेला. मग त्याच्याजवळ थेट मागणी केली की कशाला कमी पडायचं नाही, असं कदाचित तिला वाटत असेल. गणपतींनं तिचं ऐकलं का नाही माहिती नाही. आपल्या घरी येऊन त्याला वर्षातून एकदा सांगण्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं त्याला सतत विनवणी करायला ती बहुतेक कायमची त्याच्या घरी गेली असावी. हे “उदंड असू दे” मात्र आम्ही पण सुरू ठेवलंय.

गणपतीला कितीतरी जणांच्या कितीतरी मागण्या ऐकून पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे काहीजणांनी हे उदंड असण्याचं प्रकरण फारच मनावर घेतलंय. अगदी फार पूर्वीपासून. म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत जायची गरज नाही. पण प्रत्येक गोष्ट उदंड हवी आणि ती कुणाच्याही आधी मलाच हवी. किंबहुना फक्त मलाच हवी ही वृत्ती आपण आपल्या आजूबाजूलाही पाहतोच. आपल्याला हवी ती गोष्ट गणपती देवो न देवो, त्यासाठी बुद्धी मिळाली नाही तरी चालेल. कधी शक्तीच्या तर कधी धनाच्या बळावर हवं ते आपल्याच टोपलीत घेणार माणसं आपण पाहतोच. त्यासाठी दुसऱ्याच्या हक्कांना तुडवून, चोळामोळा करून टाकला तरी चालेल, असंच त्यांचं म्हणणं असतं.
त्यांच्यासारखे माणसांचे हक्क तर ते घेतातच पण निसर्गालाही सोडत नाही. माणसं कशी उलटून अंगावर येऊ शकतात. कायद्याचा वापर करू शकतात. पण निसर्गाला वकीलच नाही. खायला नाही, मार एखादा प्राणी. डास चावला, चिरडून टाक. साप घरी आला, टाक जाळून. माझ्या रस्त्यात झाड आलं, टाक तोडून. उदंड हवं चा हा हव्यास कधी कधी अती झाला की निसर्ग आपला समतोल बरोबर करतो. त्याला उदंडपणाचा हव्यास नाही. आपण म्हणतो निसर्गानं सूड उगवला. शेवटी माणसंच आपण. आपल्याच पद्धतीनं विचार करणार. पण हा निसर्गाचा समतोल असतो. कधी दुष्काळ पडतो, अती पाऊस पडतो, महापूर धुवून काढतो, त्सुनामी सगळं उलथवून टाकते, भूकंपाचे दहा सेकंद मुळापासून उपटून काढतात. सगळं होतं. चार दिवस जातात. कोलमडलेली आय़ुष्ये परत उभी राहतात. तोपर्यंत दीनवाणी वाटतात. त्यांचे हाल बघितले की राग येतो निसर्गाचा, परमेश्वराचा. पण एकदा का आयुष्य सुरळीत झालं की परत पहिल्यासारखं निसर्गाकडून ओरबाडून घ्यायला सुरू करतात.
प्रत्येक माणसाला उदंड म्हणजे किती उदंड हवं हे ज्यांचा त्याला कळतं. भूक भागली की प्राणी अन्नाला तोंड लावत नाही. पण भूक भागली तरी ज्यांचा हव्यास सुटत नाही ती माणसं. मग गाडी थांबवणं अवघड होतं, वाटेत येणाऱ्या सगळ्यांचा चेंदामेंदा करत ती सुसाट सुटते. उतारावरची गाडीही कुठंतरी जाऊन आदळतेच किंवा बुडते तरी. पण वेगाचा उन्माद विवेकाला दाबून टाकतो. मध्ये एका कार्यक्रमात एक काका भेटले होते. सातारकडचा शेतकरी गडी. डोक्यावरच्या चांदीच्या शेतीची अनुभवानं मशागत केलेली. ते म्हटले की आता पाचशे फूट खणलं तरी बोअरिंगला पाणी लागत नाही. म्हणजेच आपण आपल्या वाट्याचं पाणी केव्हाच संपवलंय. आता वापरणार तो प्रत्येक थेंब आपल्या पुढच्या पिढीचा आहे.
चार माणसं खाणारी असली तरी लोकं भ्रष्टाचार करून करोडो जमवून ठेवतात. पुढच्या पिढ्यांसाठी.
अशाच अतर्क्य हव्यासाची गोष्ट म्हणजे आरे कॉलनीतल्या झाडांच्या तोडणीची बातमी.
आपल्या मानवजातीची गाडी उताराला लागली आहे, मित्रांनो! पुढच्या पिढीसाठी काय राहणार हा विषयच नाही. ‘उदंड असू दे’ च्या हव्यासात पुढची पिढीच आपण ठेवणार आहे का हा विचार जास्त महत्त्वाचा वाटतोय.
किती समर्थ पणे चिंतन करतोयस तू.
ReplyDeleteधन्यवाद! याचा थोडफार जरी परिणाम झाला तर जास्त बरं वाटेल
Deleteअमोल मित्रा...किती पोटतिडीकेने आणि खरे लिहिले आहेस. हे वाचून माणसाच्या हव्यासाची भीती वाटू लागते. निसर्ग समतोल साधतोच साधतो पण हा समतोल साधताना होणारा भयावह परिणाम खूप अस्वस्थ आणि हतबल करणारा असतो. अमेझॉन रेन फॉरेस्ट जळतंय (की जाळलंय) त्यावर एकाने लेख लिहिला आहे. पांडवांनी खांडव वनाचा दाह केल्यामुळे लाखो जीव आणि झाडे होरपळून नष्ट झाली. त्यांच्या तळतळाटीचा परिणाम म्हणून महाभारत युद्धात लाखो जीव यमसदनी गेले. तद्वत अमेझॉन वणव्या नंतर निसर्ग समतोल साधणार आणि प्रचंड मनुष्य हानी होणार असे भाकीत आहे. मला ते पटले आहे.
ReplyDeleteश्री गजानना चरणी आता एकच प्रार्थना की देवा सर्व मानव जातीला सुबुद्धी दे, त्यांचा विवेक जागव. या जगातून दुःख-दैन्य दारिद्र्य नष्ट करून सर्वत्र सुख-समृद्धी, शांतता आणि आरोग्य यांचा वास होवो. सर्व जीवांचे मंगल होवो. श्री गजानना त्राही माम��
धन्यवाद मित्रा! खरं आहे तुझं
Deleteमाणसाचा हावरट व स्वार्थी पणा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत निसर्ग त्याची जागा दाखवत रहाणार
Deleteहव्यास मला नक्की आहे पण तो फक्त मला स्वतःलाच हरवायचा आहे. काल मी जे केले त्याच्यापेक्षा जास्त चांगले आज करायचं हा तो हव्यास. माझा सर्वात कठीण आणि अतिशय तीव्र स्पर्धक मीच असावा हा तो हव्यास.
ReplyDeleteमी मरेन तेंव्हा माझ्याबरोबर मीच असावा हाच तो हव्यास
व्वा!! अगदी बरोबर
Deleteखूपच छान भीषण वास्तव लिहिलेत आपण
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete