Thursday, September 26, 2019

रात्रीचा पाऊस – भाग १

‘बा पावसा.. इथं पडतोयंस.. तसा माझ्या महाराष्ट्रात जा.. तिथं तुझी गरज आहे. शेतकरी तुझी वाट पाहतोय. जा तिकडे पड.. जा’ साधारण अशाच आशयाचं काहीतरी आपल्या केदार जाधवनं इंग्लंडच्या पावसाला सांगितलं. महाकवि कालिदासांनी मेघाला दूत बनवून आपल्या सखीकडं पाठवलं. तसंच या पठ्ठ्यानं थेट पावसाला साता समुद्रापारहून आमच्याकडं पाठवलं. जुलै आला तरी पाऊस पडत नव्हता. पाऊस न पडण्याची कारणं वेगळी तशी प्रत्येकाच्या काळज्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. दुष्काळ पडला तर सत्ताधाऱ्यांना चिंता की येत्या निवडणुकीत मतदारांना तोंड देताना नवं गाजर शोधावं लागेल. पाऊस पडला, सुगी झाली तर विरोधकांना चिंता की यांच्यावर गोळीबार करायसाठी नवं कारण शोधावं लागेल. माझ्यासारख्याला पिण्याच्या पाण्याचा चिंता आणि शेतकऱ्याला अर्थातच जगण्याची चिंता. तर या सगळ्या चिंतांना केदार जाधवच्या ढगांनी पार धुवून काढलं. भरपूर पाऊस झाला. आमच्या कोल्हापूरात म्हणतात तसा बद्द्या पाऊस पडला.
आता सप्टेंबर संपत आला तरी पाऊस मुक्काम हलवत नाही, म्हटल्यावर मंडळींची जरा कालवाकालव सुरू झाली. पावसाला आतुरतेनं वगैरे वाट पाहणारी, पहिल्या सरीनंतर एकूण हंगामाच्या सरासरीपेक्षा जास्त कविता पाडणारी, उगाच वाफाळणारे चहाचे कप, कांदाभजी, भाजलेली कणसं, पावसात भिजलेल्या अगडबंब देहांचे फोटोबिटो यांचा पाऊस फेसबुकवर पाडणाऱ्या मंडळींचं पावसानं कवित्वाला धुमारे फुटायचे बंद झालेत. ‘आता पुरे यार..’ ‘कंटाळा आला राव’ ‘बास आता पाऊस’ अशा कमेंट्स जागोजागी ऐकू यायला लागलेत. दिवाळी करूनच जातो बहुतेक वगैरे, पावसावर विनोद सुरू झालेत आता.

लहानपण कोकणात गेल्यामुळं पुण्यातल्या पावसाची भीती वगैरे कधी वाटलीच नाही. आठ दिवस पाऊस थांबत नाही, दहा-पंधरा दिवस सूर्य दिसत नाही, सतत २४ तास घराशेजारून धबधब्यासारखा कोसळणारा पऱ्ह्या (ओढा), त्याचा आवाज, नदीकडं लक्ष ठेवून कामं करायची. घरातून नदी दिसली की शाळेला दांडी. कारण शाळेच्या रस्त्यात नक्की तिचं पाणी आलेलं असणार. तीच गोष्ट शाळेत असतानाची. ग्राऊंडच्या पलिकडं नदीपात्रात चहासारखी नदी वर डोकावू लागली की शाळा सोडून द्यायचे. आम्ही गावात राहायचो. पण वाडीत जाणाऱ्या मुलांना डोंगर, दरी, पऱ्हे ओलांडून ये-जा करायला लागायची. ती मुलं बऱ्याचदा शाळेत यायचीच नाहीत. आली तरी त्यांना लवकर सोडायचे. रेनकोट, छत्री अशा गोष्टी पावसापासून बचाव करायसाठी म्हणून बाजारात मिळायची. त्या आम्ही वापरायचोपण. फक्त शाळेत जाईपर्यंत स्वत:चे कपडे कोरडे ठेवायचे. येताना भिजायचं. म्हणजे आपल्याला फार काही करायला लागत नसायचं. आपण भिजायचोच. पण सगळ्यांनाच सगळ्याची सवय झालेली.
माझी आई तर अशा पावसात पळतपळत जाऊन बस पकडायची. तिथून अर्धाएक तासाचा प्रवास करून एका छोट्या गावात पोहोचायची. तिथून छोटासा डोंगर उतरायचा. भातखाचरांच्या बांधावरून किलोमीटरभर चालायचं. एकावेळी एकच माणूस. साधारण १०-१५ माणसांची रांग लागायची. मग समोर शंभरएक मीटरची खाडी. गढुळलेलं पाणी समुद्राकडं चाललेलं. तिथं गुडघाभर चिखलातून काही पावलं चाललं की मग होडक्यात बसायचं. पावसाळा नसताना याच पात्राची रूंदी निम्म्यानं कमी व्हायची. वेगही एवढा नसायचा. मग होडीला एक इंजिन बसवलेलं असायचं. तेव्हा त्या होडक्याला डिबको म्हणायचं. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाही मला. पण पावसाळ्यात ही होडी किंवा तर. आपल्याला नदीपलिकडं जिथं पोहोचायचंय त्यापासून प्रवाहाच्या विरूद्ध बाजूला एक किलोमीटरभर होडी पाण्यात लोटायची. पन्नासएक फूट बांबूने प्रवाहात भरकटण्यापासून वाचवायचा प्रयत्न करायचा. दुसरा एकजण वल्ह्यानं होडीला दिशा द्यायचा. एवढं सगळं झाल्यावर ती होडी पलिकडं पोहोचली की पुन्हा चिखल तुडवायचा. छोटीशी चढण चढायची. वरून पाणी दुडदुडत यायचं. ते तुमची वाट अडवणार. त्यात पुन्हा पाय घसरायची भीती होतीच. एका हातात छत्री, दुसऱ्या हातानं साडी थोडी वर उचलायची. खांद्यावर पर्स. असं शाळेत जायचं. तिथंही पावसापाण्यातून जेवढी मुलं आली आहेत, त्यांना शिकवायचं. संध्याकाळी पुन्हा उलट्या क्रमानं घरी पोचायचं. बस चुकली तर पुढची बस एकदीड तासानंतरची, तीही पावसापाण्यातून वेळेत आली तर. म्हणजे रोज साडेसहाला घरी यायची ती अशावेळी साडेआठ वाजायचे. मी आणि बाबा स्टँडवर जायचो तिला आणायला. गावात सामसूम झालेली असायची. मुंबई-गोवा हायवेचं गाव असल्यामुळं एस.स्टँडवर दहावीस माणसं, एखादी रिक्षा, वडापावच्या दोन गाड्या, एक भुर्जीपाववाला. मग ही गाडी आली की गाडीतनं उतरलेल्या दहापंधरा माणसांची त्यात भर पडायची. पुन्हा सामसूम. माझ्या आईबरोबर खातूकाकू आणि त्यांचे पती खातूसर, पराडकर सर अशी मंडळी असायची म्हणून तेवढाच आधार. तीही मंडळी इतक्याच अडचणीतून कामाच्या ठिकाणी जाऊन यायची. इतरही काही लोक वेगवेगळ्या गावांना कामानिमित्त अशाच परिस्थितीतून रोज जाऊन यायची.
त्यामुळं या सगळ्यासमोर पुण्यातला पाऊस अगदीच चिल्लर वाटायचा.

यंदा पाऊस खूप लांबलाय. सप्टेंबर महिन्यातसुद्धा एखादाच दिवस बिनपावसाचा गेला असेल. ते कसं आहे ना की आपण माणसांनी निसर्गाचे सगळे नियम वाकवायचे. पण निसर्गानं मात्र तेच करायचं जे आपल्याला हवंय. तीच गोष्ट यंदापण झाली आहे. पाऊस परतलाय म्हणण्यापेक्षा ऋतुचक्र नव्यानं रिस्टार्ट झालंय असं वाटायची परिस्थिती आली आहे. आधी वळीव, वादळी पाऊस, विजा आणि मग मॉन्सून आणि त्याची स्थित्यंतरं. पण यंदा आता पुन्हा वादळी पाऊस, विजा कडकडायला सुरूवात झाली आहे. ही गंमत आहे.
लहानपणी सारखं वाटायचं की पाऊस रात्री पडायला पाहिजे. दिवसा ऊन. मस्त खेळायला मिळायला पाहिजे. मग रात्री पडू दे पडायचा तेवढा. पण आजूबाजूची मोठी माणसं दटावायची. म्हणायची, ‘नको रे बाबा. रात्रीचा पाऊस एवढा नको.’
संगमेश्वरला १९८२ ला राहायला गेलो. एवढा पाऊस पहिल्यांदाच बघितलेला. त्यामुळं घाबरायला व्हायचं. मुलं मात्र निवांत असायची. रात्रंदिवस पाऊस असायचा. एकदा सलग तीन-चार दिवस पाऊस पडला. सगळीकडंच पडत असावा असं रेडिओवरून, वर्तमानपत्रांमधून कळायचं. आमचे घरमालक, त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी रात्र झाली की काळजीत पडायची.
आम्ही साडेनऊलाच झोपून जायचो. असं एकदा झोपलो होतो आणि आईनं मला उठवलं. नदी दाखवते चल म्हणाली. आमच्या घरासमोर मोठं अंगण, त्याला पायऱ्या, त्याच्यासमोर रस्ता, भरपूर भातशेती आणि मग नदी. रात्रीच्यावेळी नदीपलिकडच्या रस्त्यावरून एखादी एस्.टी. गेली की ते दिवे जमिनीवर चमकले की समजायचे नदीनं पात्र सोडलंय. रात्रीचं तेवढंच नदीदर्शन. पण आई म्हणाली की नदी बघायला चल म्हणजे काय हे नव्हतं लक्षात आलं.
बाहेर आलो तर सगळी मंडळी अंगणात जमलेली. मधूनअधून टॉर्चचे झोत टाकून बघायचे तर चक्क पाणी चमकलं. मला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत नदी घराजवळ आली नव्हती. असं पहिल्यांदाच घडत होतं. आम्ही राहत असलेल्या घराच्या पहिल्या पायरीला पाण्यानं स्पर्श केला. आमच्या घरमालकीण शैलाकाकूंनी नदीची पूजा केली. खणानारळानं ओटी भरली. तो सोहळा पार पडला. जीवनदायिनी म्हणून पूजा केली तरी शेवटी नदी ही नदी होती. वरून पाऊस कोसळत होता. आजपर्यंत इथपर्यंतही पाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं भीती कमी होत नव्हती. सगळी मोठी मंडळी पाण्यावर नजर ठेवून होती. पाणी हळूहळू वाढत होतं. पहिल्या पायरीपासून चौथ्या पायरीपर्यंत पोहोचलं. घरात आवरासावरी सुरू झाली. वीज दोनचार दिवसांपूर्वीच गेली होती. त्यामुळं अंधारातच सामानसुमान सुरक्षित ठिकाणी ठेवलं जात होतं.
बराच काळ झाली तरी पाणी चौथ्या पायरीवरच घुटमळत राहिलं. वाढतही नव्हतं. कमीपण होत नव्हतं. आमच्या गावात शास्त्री आणि सोनवी अशा दोन नद्यांचा संगम होत होता. सोनवी शास्त्रीला मिळून पुढं खाडी बनून अरबी समुद्रात जाते. आमच्या घरी सोनवी आली होती. भरतीचं पाणी आत घुसलं होतं, ओहोटी लागली की पाणी ओसरेल असं मोठी माणसं म्हणत होती. आम्हाला काय? शाळा नाही, याचाच आनंद. आईबाबांनाही हा अनुभव नवाच होता.
पण सुदैवानं पाणी चौथ्या पायरीवर घुटमळलं आणि हळू हळू तिसऱ्या मग दुसऱ्या आणि मग वेगानं उतरलं. आम्ही मुलं झोपलो. सकाळी पाहिलं तर पाणी शेतात गेलं होतं. रस्ता तसाही कच्चाच होता. त्यामुळं त्यातल्या मातीत गाळाची भर पडली होती, एवढंच.
नदीची ओटी भरताना काकूंनी तिला विनंती केली होती की आज माझ्या घरी आलीस. माझ्या उंबऱ्याला पाय तुझे पाय लागले. मी धन्य झाले. पण माझ्या घराची वाताहत करू नकोस. नदीनं काकुंचं मागणं ऐकलं. ती परत फिरली.
पण प्रत्येकवेळी निसर्ग माणसाचं ऐकतोच असं नाही, याचा प्रत्यय आम्हाला लवकरच येणार होता.

(क्रमश:)

6 comments:

  1. 83 ला मि नव्हतो पन ai

    ReplyDelete
    Replies
    1. Ohh. Pudhchya veli birthdate vicharun ghein. Aapla naav kalel ka? Itha Unknown asa dakhavtay

      Delete
  2. सुंदर. चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर

    ReplyDelete
  3. वा, खूप छान वर्णन, कोकणातल्या पावसाचा लहानपणी अनुभव घेतला आहे, त्याची आठवण झाली

    ReplyDelete