Monday, September 9, 2019

मुक्काम

पुन्हा दिलीप आला होता. काम काहीच नाही. बोलणंही फार काही नाही. उगीच आपला डोकावून जातो, तसा आला होता. त्याच्या मनात असलं की येतो. खरंतर माझ्या मनात असलं की येत असावा.
नेहमीसारखा पांढरा शर्ट, खाकी चड्डी घालून. बऱ्याचदा त्याच वेषात त्याला बघितलंय. कधी कधी धमक पिवळा शर्टसुद्धा असतो. पण त्याच्यावरही खाकी चड्डीच. तेव्हाही त्याच्याकडं एवढे दोनच कपडे होते. किंवा मला तरी तसं वाटायचं. पिवळ्या रंगाचा त्याचा तो शर्ट त्यानं एकदाच घातला होता. आमची सहल गेली होती त्यादिवशी. एरवी पांढराच.
इयत्ता दुसरी ते सातवी एवढी वर्षं आम्ही एकत्र होतो. म्हणजे एका वर्गात. त्यातही सातवी इयत्ता काही त्यानं पूर्ण केलीच नाही. मध्येच सोडून गेला. म्हणजे जेमतेम साडेचार वर्षांची मैत्री. संगमेश्वरला प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषदेचीच. केंद्र शाळा नं. २. तिथंच हा दिलीप मला भेटला. दिलीप माने. पहिली दोन वर्षे काही फार मैत्री नव्हती. नुसताच परिचय. मैत्री चौथीपासून सुरू झाली. माझे वडिल शिक्षक त्यामुळं माझ्यावर उगीचच हुशार असण्याचा आरोप होता. दिलीप हुशार होता. तेव्हा नंबरचं खूप खूळ होतं. दिलीप पहिल्या तीनात असायचा. मी, दिलीप, अभिजीत, मंदार. आलटून पालटून त्यात हजेरी लावायचो. दिलीप आणि मंदार माझ्या घरी कधीकधी अभ्यासाला यायचे. त्यात सगळंच आलं अभ्यास, खेळ, गप्पा. मंदारच्या घरी मी खूप वेळा गेलो. पण दिलीपच्या घरी एकदाही नाही. त्याच्या घराविषयी त्याच्याशी बोलण्यातूनच कळायचं.
हा दिलीप म्हणजे तीन बहिणींमध्ये एकटा भाऊ. म्हणून काही कोडकौतुक नाही. पण नाही म्हटलं तरी वेगळी वागणूक होतीच. वडिल पाथरवट. दगड फोडणारे. आईही तेच काम करायची. विजापूर किंवा तिकडंच कुठंतरी मूळ गाव होतं. तिथून पोटापाण्यासाठी कोकणातल्या खेड्यात आलेले. कधीतरी फार पूर्वी आले असावेत. तेवढं आता मला आठवत नाही. पण हा गडी सुरूवातीपासून याच शाळेत असायचा. काळाकभिन्न. त्याच्या वडिलांना आणि काकाला बघितलं होतं. तेही दोघं असेच. पण त्यांचा काळा वर्ण वेगळाच. विठ्ठलासारखा काळा. त्वचा तकतकीत. पॉलिश केल्यासारखी.
अशिक्षितपणा आणि जोडीला गरीबी. त्यातनं येणारी निराशा, अपमान, अवहेलना त्याचे वडिल दारूत बुडवून गिळायचे. मेंदूवरचा ताबा सुटला की मग कुटुंबावर हात उगारला जायचा. कधीमधी दिलीपवरही पडायचा. पण त्याला त्याचं विशेष काही वाटायचं नाही. त्यावेळी कुठल्याच लहान मुलाला माराचं काही वाटायचं नाही. एकदम सामान्य गोष्ट होती. तरी याही परिस्थितीत त्याच्यासमोर आदर्श होता त्याचा काका. त्याचा हा काका माझ्या वडिलांचा विद्यार्थी. तो एस्.टी. मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला लागला. दिलीपला त्याच्यासारखं व्हायचं होतं. तसंही माझ्या लहानपणी कुणालाच अंतराळवीर वगैरे व्हायची स्वप्न पडत नसत. डॉक्टर इंजिनिअर नाहीतर बँक. पण याला काही होण्यापेक्षा कमावून घरातलं दारिद्र्य, दुःख घालवायची घाई होती. त्याच्या पायात चपलाही नसायच्या. त्याची स्वप्नं काय वेगळी असणार होती?
माझ्या आईला तो सांगायचा की मी खूप शिकणार आहे. लवकर कमवायला लागणार आहे. बहिणींची लग्न करायचीत. पत्र्याच्या खोलीत सहा-सात जणांचं कुटुंब राहायचं. त्यात हा अभ्यास करायचा. रॉकेलचा दिवाच असायचा बहुतेक. नक्की आठवत नाही. अशात अभ्यास करून पाचवीत त्याला आणि मला विभागून पहिला क्रमांक मिळाला. माझे बाबा मला म्हणाले होते की कोण आहे हा दिलीप माने. मी त्याला बक्षीस देणार आहे. खरं सांगतो, खूप वाईट वाटलं होतं. पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मुलगा आपल्याबरोबरीनं पहिला नंबर मिळवतो म्हणजे काय? मित्रच होता माझा. पण तरी खूप राग आला होता.
तरी बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचोच. कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायचो. आपल्या घरची बरी परिस्थिती आहे. त्याची अजिबात नाही. तो पुस्तकं कशी आणत असेल. शाळेत एखाद्या परीक्षेची फी कशी भरत असेल. एवढा विचार करण्याचं वयं नव्हतं. समजही नव्हती. कधी आजारी पडला तर सरकारी दवाखान्यातून औषध आणून पुन्हा कामाला लागायचे लोक. तसाच हा पण.
सातवीत गेल्यावर काही दिवसांनी दिलीप मधनंअधनं गैरहजर असायचा. सारखा आजारी पडायचा. तसंही कोकणातल्या पावसात मुलं गैरहजर राहायचं प्रमाण वाढायचंच. पण दिलीपला माझ्यासारखी दांड्या मारायचा छंद नव्हता. त्याला शाळेत यायला मनापासून आवडायचं. पण पावसाळा संपला तरी त्याचं आजारपण असायचंच. त्याला खोकला झाला. कमीच होईना. आमचा अभिजीत बातमी घेऊन आला की दिलीपला उपचारांसाठी मिरजेला घेऊन गेलेत, मिशन हॉस्पिटलमध्ये. त्याला टीबी झाला होता. टीबी झाला की मिशन हॉस्पिटल, मिरज इथं नेतात असं मला वाटायचं. कारण आमच्या जवळच्या एकाला तिथं नेलं होतं. त्याचा टीबी पूर्ण बरा झाला.
मला आठवलं की कधी कधी तास सुरू असतानाही तो खोकायचा. मुलांना आपला त्रास होऊ नये म्हणून मागच्या बाकावर बसायचा. तोंड दाबून खोकायचा. एकदा असाच खोकल्याची उबळ आली. तोंड दाबून खोकताना चित्रविचित्र आवाज आले. आमच्या वर्गावर तेव्हा ऑफ तासावर एक सर बदलून आले होते. ते सरही शाळेत नवे होते. विचित्र आवाज ऐकून मुलं हसायला लागली. सरांना वाटलं की हा मुद्दाम करतोय. म्हणून त्यांनी त्याच्या पाठीत गुद्दा घातला. तो कळवळला. सगळा वर्ग एकदम शांत झाला. सुन्न झाला होता बहुतेक.
बरेच दिवस मध्ये गेले. कधीमधी दिलीपविषयी कळायचं. प्रकृतीत सुधारणा आहे असं समजायचं. बरं वाटायचं.
तेव्हा संगमेश्वरला घरासमोर मोठं अंगण होतं. संध्याकाळी तिथंच मुक्काम. बाबा शेजारच्या सप्रे काकांशी गप्पा मारत होते. आम्ही मुलंही तिथंच होतो. आमच्याही काहीतरी गप्पा सुरू होत्या. खूप वाजले नव्हते. पण अंधार पडला होता. हळूहळू गप्पांमधला माझा सहभाग कमी झाला. मलापण कळलं नाही. लांब कुठंतरी अंधारात पाहत होतो बहुतेक आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हळूहळू मी हुंदके द्यायला लागलो. सगळ्यांच्याच लक्षात आलं ते. बाबांनी मला जवळ घेतलं. समजावत राहिले. सांगितलं की दिलीप बरा होऊन येईल परत खेळायला. पण माझं रडू कमीच येईना.
दुसऱ्या दिवशी बातमी आली की आमचा दिलीप माने आम्हाला सोडून गेला. टीबीनं त्याचा घात केला. सुरूवातीला उपचार झाले नाहीत किंवा देवदेवस्कीचे उपचार झाले बहुतेक. त्यामुळं मिरजेला न्यायला उशीर झाला. बरेच काही काही ऐकायला मिळालं. कारण काहीही असो. दिलीप आम्हाला भेटणार नव्हता. शेवटचा कधी भेटला तेही आठवत नाही. त्याचा व्यवस्थित निरोप घेतला का तेही लक्षात नव्हतं. बहुतेक पांढरा शर्ट खाकी चड्डीमध्येच भेटला होता तो शेवटचा.
आदले दिवशी जेव्हा मी हुंदके देऊन रडत होतो, तेव्हाच तिकडं त्याचं जीवन संपलं होतं.
माझी आजी गेली तेव्हा मी दुसरीच होतो. तेव्हा तो आघात फार काही जाणवला नसावा. कुणी जातं म्हणजे काय होतं हे फारसं कळलंच नव्हतं. तोपर्यंत जाणं म्हणजे नक्की काय होतं हे जरी माहित नव्हतं तरी हे नक्की माहित होतं की दिलीप गेला म्हणजे तो कधीच कुणालाच हाडामांसाचा म्हणून दिसणार नव्हता. त्याचं शरीर चालवणारी ऊर्जा संपली. तो गेला.
तर तेव्हापासून हा मधूनअधून मला ढोसतो. काय माहित? पण तो आठवला नाही असे सलग काही महिने गेलेत असं काही झालं नाही. काही ना काही कारणाने असेल किंवा काहीच कारण नसेल. पण दिलीप असा मधून अधून डोळ्यासमोर येतोच. तो तसा निघून गेला. त्याचा एक फोटो अभिजीत घेऊन आला. आम्ही वर्गणी काढून फ्रेम केला. आमच्या सातवीच्या वर्गात होता तो. आताचं माहिती नाही. पण मला दिलीप जसाच्या तसा आठवतो. तेव्हा तो गेला म्हणतात. कदाचित तो मनातून कधीच गेला नसेल. मुक्काम असेल. येईल परत थोड्या दिवसांनी. कदाचित आजसुद्धा.

12 comments:

  1. सगळे दिलीप आठवून गेले,!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला आठवतच असतात. कधीतरी डोकावून जातात.

      Delete
  2. पोटात गलबलून आलं रे हे वाचून.
    पण आपलं मन पण ना...एव्हढं निगरगट्ट असत ना की काळ जाईल तसं असे कित्येक दिलीप येतात आणि जातात. विसरून जातो आपण. पण कुठंतरी दूर मनाच्या एखाद्या हळव्या कोपऱ्यात हे दिलीप लपून बसतात. तुझ्या भाषेत कायमचा मुक्काम ठोकून राहतात. आणि वेळ आली की परत आठवतात आणि पोटातलं पोटात तुटून येतात.

    ReplyDelete
  3. जिवंत ऊभा राहिला दिलिप!!!

    ReplyDelete
  4. जिंकलस रे भावा

    ReplyDelete