Thursday, September 19, 2019

खारीचा वाटा


आम्हाला या नव्या घरी राहायला येऊन चार वर्ष झाली जवळजवळ.
पुण्यासारख्या शहरात नव्या ठिकाणी राहायला गेलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामवाली बाई मिळणं. तुम्ही लाख शोधाल, पण तुम्हाला योग्य कामवाली मिळणं नशिबाचाच भाग असतो. आमच्या सुदैवानं आमच्याकडं नंदा आली. खरंतर, महानंदा नाव तिचं. कर्नाटकाच्या सीमेवरचं गाव तिचं. पोटापाण्यासाठी घरची शेतीभाती असतानादेखील हे कुटुंब इकडं आलं. तशी बरीच कुटुंब आलीत इथं. तिचा नवरा मारुती आमच्या सोसायटीतली असंख्य छोटीमोठी कामं करतो. कमी शिक्षणाचा शाप असला तरी सुदैवाने अशिक्षितपणाबरोबर येणारी व्यसनाची कीड या कुटुंबात आली नाही. यांना तीन मुलं. दोन मुलींवर तिसरा मुलगा – प्रज्ज्वल किंवा प्रेम. आम्ही राहायला गेलो तेव्हा हा नुकताच चालायला लागला होता. कधीकधी ती घेऊन येते मुलांना. थोरली भाग्यश्री खूप हुशार आणि कामसू. म्हटलं तर सगळंच छान. अगदी छोटं नाही तरी छोटेखानी कुटुंब. दोघंही नवराबायको अफाट कष्ट करतात. पुण्यासारख्या ठिकाणी घर चालवायला, मुलाबाळांची हौस भागवायला व्यवस्थित पैसे मिळवतात. थोडंफार सोनंही करतात.
पण हे सगळं भूतकाळात गेलंय. म्हणजे अगदी नजिकच्या एखाद्या वर्षामागच्या भूतकाळात. किराणा सामानच्या यादीत डाळ, तांदूळ, तेल अशा पदार्थांबरोबर औषधांची भर पडली. लहानग्या प्रेमला अन्न पचेना. ताप उतरेना. जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. गोळ्या औषधं घेतली. तात्पुरतं बरं वाटायचं. पण पुन्हा तीच गत. नंदा-मारूतीच्या कामावर दांड्या पडायला लागल्या. सुदैवानं त्यांच्या गोड स्वभावामुळं कामाच्या ठिकाणची माणसं ‘माणसं’ होती. त्यामुळं निभावून जायचं. एका डॉक्टरच्या औषधांनी उपाय पडेना म्हणून दुसरा डॉक्टर, मग तिसरा. कधी या टेस्ट, त्या टेस्ट. पृथ्वीवरचे उपाय थकले की आकाशात उत्तरं शोधली जातात. इथं गरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित, ग्रामीण-शहरी असं काहीच नसतं. पोटच्या पोरांसाठी माणसं कुठल्याही थराला जातात. या दोघांनीही कुणी सांगितलं म्हणून हा नवस, कुणी बोललं म्हणून तिथल्या देवाला साकडं घाल, हे सगळं केलं.
प्रेम मधून अधून यायचा आमच्याकडं. माझ्या मुलाची गाडी घेऊन खेळायचा. मनात आलं तर काही खायचा. बऱ्याचदा नकोच म्हणायचा. एवढं गोड पोरगं. वरनं पाहिलं तर कळतही नाही की त्याच्या इवल्याशा शरीरात नेमकं कुठं काय चुकतंय. पण आता इलाज नव्हता. आवाक्यातल्या सगळ्या उपचारांनी हात टेकले होते. मोठ्या दवाखान्यात दाखवावंच लागणार होतं. त्यातही जिथं परवडेल अशाच हॉस्पिटलपासून सुरूवात केली. नाही म्हटलं तरी आपल्यालाही मोठ्या दवाखान्याची भीतीच असते. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्या आवश्यक त्या टेस्टस् केल्या, आधीच्या तपासण्यांचे निकाल पाहिले. मग निदान केलं. या एवढ्याशा प्रेमला भलामोठ्या आजारानं ग्रासलंय. डॉक्टरांनी निदान केलं कॅन्सर म्हणून. ब्लड कॅन्सर.
त्यालाच का? याला काहीच उत्तर नाही. आईबापाच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. पाचवीतली भाग्यश्री अचानक मोठी झाल्यासारखी वाटते. मधली प्रियांका. तिला बालपणच नाही. आणि ते एवढंस पिल्लू, प्रेम. त्याला आपण आजारी पडतो. त्यामुळं शाळेत जायला मिळत नाही. एवढंच कळतंय.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा दहा लाख खर्च आहे. हॉस्पिटलचं कोटेशन इथं देतोय. यातही विशिष्ट शासकीय सवलतीत ही केस बसत नाही, असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. माझ्या सोसायटीतली काही मंडळी जिथून शक्य आहे, तिथून निधी उभा करण्याचा प्रयत्न करताहेत. ही ट्रीटमेंट संपूर्ण वर्षभर चालणार आहे. आम्ही काही जणांनी थोडेफार पैसे जमा केलेत. पण ते अर्थातच अपुरे आहेत. मला माहिती आहे, की एवढे सगळे पैसे एकाच ठिकाणी एका वेळी जमणं केवळ अशक्य आहे. पण प्रत्येकानं थोडाथोडा वाटा उचलला तर कदाचित हे शक्य आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अकाऊंटलाच पैसे जमा करायचे आहेत. बघा. जमलं तर आपण मिळून त्या प्रज्ज्वलला आणि या कुटुंबाला पुन्हा हसतंखेळतं राहायला मदत करू शकतो. विनंती आहे.

No comments:

Post a Comment